ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २८ - दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या 'सैराट'ने फक्त देशातच नव्हे तर परदेशातही सर्वांना वेड लावलं आहे. हा चित्रपट सर्वांच्या कौतुकास पात्र ठरलेला असताना स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी मात्र चित्रपटावर टीका करताना केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 'मराठ्यांची इज्जत काढणा-या, अपमान करणा-या सैराट चित्रपटाने कोट्यावधी रुपये कमावले मात्र तरीही त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही, मराठे शांत का?' असा प्रश्न विचारत राणेंनी टीका केली.
मराठा आरक्षण प्रश्नावर सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सैराट’ चित्रपटातील मराठा समाजाच्या केलेल्या चित्रणावर आक्षेप घेतला. 'मराठ्यांची लायकी काढणारा हा चित्रपट ८० कोटी कमावतो. मात्र अशाचप्रकारे चित्रपटात ब्राह्मण वा अन्य समाजाचे समाजाचे चित्रण केले असते, तर तो समाज शांत बसला असता का? त्यांनी संबंधितांना महाराष्ट्रात फिरू दिले असते का?' असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.
यावेळी राणेंनी ठाकरे घराण्यालाही लक्ष्य केले. शिवसेनेचा वाघ गल्लीगल्लीतून संपल्याची टीकाही त्यांनी केली.