अहमदनगर- देशाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे. नीरव मोदीच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळामधील 125 एकर जमीनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी कब्जा केला. तसंच ट्रॅक्टर आणि बैलजोड्या आणून शेतकऱ्यांनी जमीन नांगरली. उद्यापासून या जागेत शेती करणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हंटलं आहे.
काळी आई मुक्ती संग्रामचा नारा देत घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी जमिनीवर कब्जा केला. अत्यंत कवडीमोल भावानं शेती घेतल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या.
नीरव मोदीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झाल्यावर ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त केली. यावेळी ईडीनं त्याच्या खंडाळ्याची जमीन सील केली. तेव्हापासून या जमिनीवर ईडीचा ताबा आहे. मात्र अजूनही इथला ऊर्जा प्रकल्प सुरुच आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही. तोपर्यंत या जमीनीवर अंमलबजावणी संचालनालयाची कब्जा राहणार आहे.
दरम्यान, नीरव मोदी याने ही जमीन थेट न घेता मध्यस्थीच्या माध्यमातून खरेदी केली आहे. जमिनीवरील आमचा मालकी हक्क दाखविण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे. नीरव मोदीसारख्या लोकांना बँकांकडून करोडो रूपये दिले जातात व शेतकऱ्यांना साधे 10 हजार रूपयेही दिले जात नाहीत. म्हणूनच आम्ही भूमी आंदोलन सुरू केलं आहे, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली आहे.