कोल्हापूर-गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेले नितेश राणे यांची आज जामीनावर सुटका झाली. पोलीस कोठडीतून बाहेर येताच नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणेंना राजकीय आजार झाल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या शस्त्रक्रियेबाबतच्या मुद्द्यावर विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. "प्रश्न तर आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का?", असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे.
"मला आजही त्रास होतोय, कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार आहे. मणका, पाठीचा त्रास, शुगल लो होत आहे. त्यावर उपचार घेणार आहे. पण जे बोललेत की हा राजकीय आजार आहे. त्यांना माझं एकच सांगणं आहे की मग आरोग्य व्यवस्थेने केलेल्या चाचण्या काय खोट्या आहेत का? आताच माझं बीपी तपासून पाहिलं तर ते १५२ इतकं आहे. ते काय खोटं दाखवत आहे का? कुणाच्याही प्रकृतीबाबत प्रश्न उपस्थित करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का?", असे सवाल उपस्थित करत राणेंनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.
मुख्यमंत्री ठाकरेंवर लक्ष्य "माझ्या प्रकृतीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तसे प्रश्न आम्हीही विचारू शकतो. जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट घालतात का? लतादीदींच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री गेले त्यावेळी कोणताही बेल्ट नव्हता. मग ते अधिवेशनावेळीच नेमकं आजारी कसे पडतात? चौकशीवेळीच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्यबाबत असे प्रश्न उपस्थित करणं कितपत योग्य आहे? राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो याचाही विचार करायला हवा", असं नितेश राणे म्हणाले.
मी ज्या दिवशी बोलेन तेव्हा..." मी कोणत्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. तपास कार्यात कोणताही अडथळा आणला नाही. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होतो. मला अटक केली नाही तर मी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो. हे सरकार मला अटक करु शकले नाही. या सर्व प्रकरणावर मी बोलणार आहे. ज्या दिवशी मी बोलणार त्या दिवशी मात्र अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल", असा इशाराच यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.