- वैभव देसाईगेल्या अनेक दिवसांपासून भाजपात जाण्यास उत्सुक असलेल्या नारायण राणेंचा पक्ष प्रवेश कधी होणार, याचीच कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती. राणेंचा पक्ष प्रवेश झाला नसला तरी राणेंचे पुत्र नितेश राणेंना भाजपानं कणकवलीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकूणच तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. भाजपाच्या प्रमोद जठार यांनी माघार घेत आमदारकीसाठी नितेश राणेंचं नाव पुढे केल्याचं कणकवलीतल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते अतुल काळसेकरांनी सांगितलं. एकंदरीतच भाजपानं टाकलेल्या या गुगलीनं कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेले संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्यानं ते भाजपाचेच अधिकृत उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे भाजपाने कणकवलीतून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्याविरोधात एकवटल्याचे चित्र आहे.भाजप नेतृत्वाच्या निर्णयाविरोधातच 'या' कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत नितेश राणेंच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंचे काम करणार नसल्याची भूमिका या जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. खरं तर गेल्या पाच वर्षांत नितेश राणेंनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांनी जोडलेला मतदारसंघ पिंजून काढला आहे. या तिन्ही तालुक्यांतील गावागावात भेटीगाठी घेऊन त्यांनी जनतेच्या विकासाची कामं केली आहे, मग स्वखर्चातून दिलेल्या बोअरवेल असो किंवा रस्त्यांसाठी निधी, अशी कामं करून अनेक गावांमध्ये त्यांनी जनतेचा आशीर्वाद मिळवलेला आहे. तसेच त्यांच्या विरोधात कणकवली मतदारसंघात म्हणावा तसा तगडा उमेदवार नाही. संदेश पारकर असो किंवा अतुल रावराणे यांचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. कणकवली तालुका सोडल्यास इतर दोन तालुक्यांत त्यांनाही फारसा जनाधार नाही.
Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय?
By वैभव देसाई | Updated: October 4, 2019 15:54 IST