मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांच्यावर टीका करण्याची संधी शिवसेनेचे नेते सोडत नाही. मात्र अशातच आमदार नितेश राणे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात हाडवैर नाही तर ते बनवलं गेले. शिवसेनेतील काही मंडळी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना चुकीचं सांगत असतात. ती माणसं त्यांच्या लक्षात आली तर उद्धव ठाकरेंचे भले होईल असं नितेश राणे म्हणाले आहे.
भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी सांगितले की, कोरोना काळात आमच्या हॉस्पिटलच्या उद्धाटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची शेवटची भेट झाली. मी आणि आदित्यही एकदा भेटलो होते. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले नाते होते. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय. राणे-राज-उद्धव एकत्र असते तर आज महाराष्ट्रासाठी वेगळं चित्र असतं. उद्धव ठाकरेंना कोण जवळचं आहे हे ओळखता आलं तर आदित्य आणि शिवसेनेसाठी चांगले आहे. संजय राऊतांनी लोकप्रभात असताना सातत्याने बाळासाहेब-मासाहेब यांच्यावर टीका केली होती. ज्या दिवशी संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरे यांना कळेल तेव्हा त्यांचे भलं होईल असं ते म्हणाले आहेत.
तसेच राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे. परंतु राजकारण हे राजकारणासाठी असतं. वैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. जर महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने, तरुणांच्या रोजगाराबद्दल काही सकारात्मक प्रस्ताव घेऊन यायचे असतील. तर निश्चितच नारायण राणे(Narayan Rane) हे त्यासाठी पुढाकार घेतील असंही नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, संजय राऊत(Sanjay Raut) यांनी लोकप्रभामध्ये असताना मासाहेबांवर टीका केली होती. बाळासाहेबांबद्दल टीका करत होते. संजय राऊत हे पवारांसाठी काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. सामनाची जबाबदारी बाळासाहेबांनी राऊतांवर दिली कारण बाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. संजय राऊत यांचा उद्देश समजून घ्यायला पाहिजे. पवारांचं काम संजय राऊत करतायेत. नारायण राणे यांना डिवचायचं आणि ठाकरेंविरोधात बोलायला लावायचं, मग अनेक प्रकरण बाहेर काढायची. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे असंही नितेश राणे यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ