सिंधुदुर्ग - भाजपानं मला एक जबाबदारी दिलीय, सकाळचा भोंगा जो कुणाला आवडत नाही त्याची हवा काढण्याची जबाबदारी वरिष्ठांनी माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे आजपासून भाजपाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सगळेच, त्यांच्यावर संजय राऊत यांनी कुठलाही खोटानाटा आरोप केला. खालची पातळी वापरली, अपशब्द वापरला तर मग संजय राऊतांनी माझी पत्रकार परिषद आर्वजून ऐकावी. नितेश राणेंनी मला इशारा दिला नव्हता हे परत बोलू नये. यापुढे आमच्या कुठल्याही नेत्यावर खोटे बोलला तर आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल शिवसैनिक आहोत. संजय राऊतांसारखे चायनिज मॉडेल नाही. जर आमच्या पक्षाच्या नेत्यांवर बोलले तर मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे कपडे अंगावर ठेवणार नाही. टराटरा फाडीन असा निर्वाणीचा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांना दिला आहे.
नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितले की, राऊतांनी शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल बोलणे हे त्यांची लायकी धरून नाही. त्यामुळे यापुढे विचार करून बोलावे. संजय राऊतांसारखी माणसे बाजारात विकत मिळतात. राऊत बोलले तर अर्धा तासात उद्धव आणि आदित्यची सगळी कपडे फाडणार. आता त्यांनी ठरवावे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची किती इज्जत ठेवायची. किती कपडे अंगावर ठेवायचे हे त्यांच्या हातात आहे. नारायण राणे हे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून ३९ वर्ष होते. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे यापुढे जपून बोलावे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत तुम्हाला भ्रष्टाचाराची इतकी खुमखुमी आहे. भाजपात आल्यावर कारवाई बंद करते असं वाटत असेल तर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आहे तिकडून ऑर्डर आणा, तुमचे हात कुणी बांधले नाहीत. माध्यमांसमोर आरोप का करताय? भ्रष्टाचाराचा आरोप उद्धव ठाकरेंवरही झालाय, खूनाचा आरोप आदित्य ठाकरेंवर झालाय. नंदकिशोर चर्तुवेदी, पाटणकर यांचेही भ्रष्टाचार आहेत. ठाकरे कुटुंब आणि जुहूला राहणारे जस्त्रा यांचे काय संबंध हेदेखील बाहेर येईल. दिशा सालियनचे प्रकरण समोर येईल. ते ऐकण्याची तयारी ठेवावी असं नितेश राणे म्हणाले.
पहिले पाऊल आम्ही टाकणार नाहीनारायण राणेंचे नाव घेऊन मला घाबरवण्याची हिंमत करू नये. तु राणेंना ओळखले नाहीत. राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा कारमध्ये रामदास कदमांना बसवल्याशिवाय उद्धव घराबाहेर पडत नव्हते. रामदास कदम हे बोललेत. यापुढे विचार करून बोलावे. कुठेही पातळी सोडून बोलाल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय काय बाहेर येईल तूच विचार कर. तुझ्यामुळे ठाकरेंची अंडीपिल्ली बाहेर येतील हे राज्याला कळू द्या. पहिले पाऊल संजय राऊत टाकतील आणि आम्ही टाकणार नाही असंही नितेश राणेंनी स्पष्ट केले.
राऊतांवर देशद्रोहाचा खटला भरा सत्यपाल मलिक कोण ज्याचे सध्या पाकिस्तान सरकार गोडवे गातंय. सत्यपाल मलिक खरे बोलत असतील तर हा भारताचा खरा चेहरा आहे असं जगात म्हटलं जातंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी होतेय. त्या माणसाला भेटायला संजय राऊत जातायेत. स्वत:ला देशभक्त म्हणवतात आणि जो माणूस देशाची बदनामी करतोय त्याला भेटण्यासाठी जातोय. राऊतांवर देशद्रोहाचा खटला भरा, देशाविरोधी कारवाया करणाऱ्यांना मदत करतायेत अशी मागणी नितेश राणेंनी केली.
आजपासून चौकटीत राहायचे राऊत म्हणतात, बेळगावात मराठी माणसांसाठी मी ३ मे ला जाणार आहे. मग पत्राचाळीत पाकिस्तानी राहत होते का? असा सवाल नितेश राणेंनी करत पत्राचाळीतील सभासदांना घेऊन मी बेळगावात येतो. कोण मराठी माणूस खरा बोलतो ते पाहू दे. पत्राचाळीतील माणसांचे पैसे यांनी खाल्ले. पहिले या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे आजपासून चौकटीत राहायचे असंही राणे बोलले.