मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही, तर गावाला विकासासाठी निधी देणार नाही, अशी धमकी देणारा भाजपा आमदार नितेश राणेंचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नितेश राणेंनी दिलेल्या या धमकीवरून आता विरोधत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कमालीचे आक्रमक झाले आहेत. सत्तेचा माज कसा असतो हे भाजपा आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले आहे, हे नितेश राणे यांनी दाखवून दिले आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर टीका करताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, नितेश राणे यांनी मतदारांना धमकी दिली आहे. तसेच सत्तेचा माज कसा असतो हे नितेश राणे यांनी दाखवून दिले आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापासून जिल्हाधिकारी हे आपल्या खिशात आहेत, असे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. यालाच सत्तेचा माज म्हणता येईल. नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये जनता आम्हाला विजयी करेलच. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत नितेश राणे यांचा पराभव निश्चित आहे. तर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ग्रामपंचायती अधिकाधिक निवडून येणार आहेत, असे वैभव नाईक यांनी सांगितले.
याआधी नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनीही असाच सत्तेचा माज दाखवला होता. तेव्हा जनतेने त्यांचाही माज उतरवला होता. मंत्री असताना नारायण राणे पराभूत झाले होते. आता नितेश राणेंचा माजही जनता उतरवेल, असा विश्वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नांदगाव येथे प्रचारसभेत बोलताना नितेश राणे यांनी हे विधान केले होते. ते म्हणाले होते की, मी आणखी एक महत्त्वाचा एक मुद्दा स्पष्टपणे सांगतो तो म्हणजे जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल त्या गावाचाच विकास मी करणार अन्यथा विकास करणार नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. माझ्याकडे आकडेमोड आहे. आपण लपवाछपवी करत नाही. आम्ही नारायण राणेंच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक ओठात एक असं करत नाही. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही, याची काळजी मी निश्चितपणे घेईन.