ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्याचे लक्ष लागलेल्या शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी बुधवारी पूर्ण झाली. यावर उद्या न्यायालय निर्णय देणार आहे.
१८ डिसेंबरला जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर हल्लाप्रकरणी ६ संशयितांना अटक केली. ‘स्वाभिमान’चे पुण्यातील कार्यकर्ते सचिन सातपुतेंच्या अटकेनंतर पोलिसांची चक्रे आ. राणे व संदेश सावंत यांच्या दिशेने फिरली. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबरला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयात अपूर्ण राहिलेली सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, कामात व्यस्त असल्याने पोलीस ठाण्यात हजर राहू शकत नाही; आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधू शकतो, अशा आशयाचे पत्र राणे यांच्या वतीने पोलिसांना दिल्याचे समजते.
राणेंचे वकील, सरकारी वकिलांमध्ये जोरदार खडाजंगीयावेळी सरकारी पक्षाच्यावतीने तिघे तर नीतेश राणे यांच्यावतीने सहा वकिलांची फौज होती. नीतेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जाेरदार खडाजंगीही झाली.
नितेश राणे कोठे आहेत? - नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू असतानाच पोलीस त्यांच्या शोधासाठी जंगजंग पछाडत आहेत. - त्या अनुषंगानेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून चौकशीला हजर राहण्याबाबत बुधवारी नोटीस बजावण्यात आली. राणे यांच्या निवासस्थानावरील भिंतीवर ही नोटीस डकवण्यात आली.- मंत्री राणे यांनी ‘आमदार नितेश राणे कुठे आहेत, ते सांगायला मला मूर्ख समजता का? ’ असा सवाल मंगळवारी पत्रकारांना केला होता. त्याअनुषंगानेच ही नोटीस बजावल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.