ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - स्वच्छता अभियानात सहभागी होऊन मराठी माणसाचा द्वेष करणा-या गुजराती माणसांचा सफाया करायचा आहे, असे ट्विट करून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एक नवा वाद निर्माण केला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या मराठी विरुद्ध गुजराती असा वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राणे यांनी हे ट्विट करत मराठीद्वेष्ट्या गुजराती नागरिकांवर निशाणा साधला आहे.
'मी स्वच्छता अभियानात सहभागी होऊ इच्छितो. त्याची सुरूवात मला मुंबईतून करायची आहे. मराठीचा द्वेष करणा-या गुजराती नागरिकांचा मला सफाया करायचा आहे' असे ट्विट त्यांनी केले. राणे यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला असून अनेकांनी राणेंवर टीका करायला सुरूवात केली. त्यावर राणेंनी आणखी एक ट्विट केले. ' गुजराती लोकांचा सफाया करण्याबाबत मी केलेल्या ट्विटवर अनेक लोक माझ्यावर टीका करत आहेत. त्यांच्या (गुजराती नागरिक) द्वेषपूर्ण वक्तव्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही, त्यावर कोणीच बोलत नाहीये', असे राणेंनी आपल्या दुस-या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रात मराठी लोकांसोबत अनेक गुजराती गुण्यागोविंदाने राहतात, मग काही विशिष्ट लोकचं आम्हाला असे कमी का लेखत आहेत असा सवालही त्यांनी केला. यापूर्वीही नितेश राणे यांनी गजराती लोकांवर निशाणा साधत त्यांच्या शाकाहारी असण्याचीही खिल्ली उडवली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे कोकणातील कणकवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत.