मुंबई :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज लातूर येथे बोलताना पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारी लोकं मराठ्यांविरोधात बोलत आहेत, त्यांना आवरा अन्यथा सामना आमच्याशी आहे, असं आव्हान जरांगे पाटील यांनी दिलं होतं. जरांगे पाटील यांच्या या टीकेनंतर भाजपकडून आमदार नितेश राणे हे मैदानात उतरले असून तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत नितेश राणेंनी जरांगे पाटलांना खडसावलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण करताना नितेश राणेंनी म्हटलं आहे की, "मनोज जरांगे पाटील यांना आम्ही पहिल्या दिवशीच स्पष्ट केलं होतं की, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली तर आम्ही कधीही सहन करणार नाही. मग तुमच्या डोक्यात विष कोण टाकतंय, तुमची भाषणं कोण लिहून देतंय, तुमच्या तोंडातून मुस्लीम आरक्षणाची भाषा कोण करायला लावतंय, याची पुराव्यासाठी आम्हाला यादी बाहेर काढावी लागेल."
मनोज जरांगेंना प्रतिआव्हान
एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलेलं असताना नितेश राणेंनीही आता जरांगेंना प्रतिआव्हान दिलं आहे. "तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलत राहाल, तर आम्ही स्वागतच करू. पण ज्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या, त्या देवेंद्र फडणवीसांविरोधात तुम्ही भूमिका घ्यायला सुरुवात केलीत तर गाठ या मराठ्यांशी आहे, हे लक्षात राहू द्या," असं नितेश राणे म्हणाले.
फडणवीसांविषयी काय म्हणाले जरांगे पाटील?
मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मराठा समाज सध्या शांत आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आम्हाला शांत राहू द्या. तुमच्या डोक्यातील विषारी विचार मराठा नेत्यांच्या डोक्यात ओतू नका आणि त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कलह निर्माण करू नका. अन्यथा तुमचा सामना आमच्याशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता. पण आता त्यांनी पुन्हा खोड्या सुरू केल्याचं दिसत आहे. कारण मराठा आरक्षणाविरोधात जे लोक बोलत आहेत त्यामध्ये भाजपमधीलच काही मराठा नेतेही आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे फडणवीसांनी या नेत्यांना समज द्यावी, नाहीतर उघडपणे भूमिका जाहीर करावी. मगा आम्हीही बघून घेऊ. या नेत्यांना आवरलं नाही तर आम्ही तुमचं सगळंच बाहेर काढू ," असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.