मुंबई - त्रिपुरामधील कथित घटनेच्या विरोधात काल रझा अकादमीने राज्यात काही ठिकाणी काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्याविरोधात आज राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपा आक्रमकपणे मैदानात उतरला आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच राज्यातील वातावरण गंभीर असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी एक प्रक्षोभक विधान केले आहे. महाराष्ट्र सरकारने रझा अकादमीवर लवकरात लवकर बंदी घालावी. नाहीतर त्यांना कसं संपवायचं ते आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये बघू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
नितेश राणे म्हणाले की, ज्या पद्धतीने रझा अकादमीने पूर्णच्या पूर्ण ही दंगल मागून घडवली आहेत. त्याचा माहिती आमच्याकडे आहे. पत्रके वाटली गेली. लोकांना भडकवले गेले. त्रिपुरामध्ये आपल्या समाजाला संपवालया निघाले आहेत, अशी भाषणे केली गेली. त्यानंतर काल तो मोर्चा निघाला आणि दगडफेक झाली. लोकशाहीमध्ये मोर्चे काढण्याचा अधिकार सर्वांना आहे, असं आमचं मत आहे. मराठा समाजानेही ५८ मोर्चे शांततेत काढले. कुठेही गालबोल लागले नव्हते. पण काल एका वेगळ्या उद्दिष्टाने तो मोर्चा काढला गेला. स्वत:ची ताकद दाखवण्यासाठी मोर्चा काढला गेला. हिंदूंना दबावात आणण्यासाठी मोर्चा काढला गेला. त्यामुळे जे काय घडतंय ते पाहून महाराष्ट्र सरकारने रझा अकादमीवर लवकरात लवकर बंदी घालावी. नाहीतर त्यांना कसं संपवायचं ते आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये बघू.
यावेळी रझा अकादमीला भाजपाचं पिल्लू म्हणणाऱ्या संजय राऊत यांचाही नितेश राणेंनी समाचार घेतला. ते म्हणाले की, संजय राऊत आणि शिवसेनेने आपला आत्मा सत्तेसाठी विकून टाकला आहे. संजय राऊत यांना माझा सल्ला आहे की, जास्त लांब जाऊ नका. त्यांना मी बाळासाहेबांच्या भाषणाची सीडी त्यांना पाठवणार आहे. ती भाषणं ऐकल्यावर संजय राऊतांना कळेल की शिवसेनेची ओरिजनल भूमिका काय होती. तसेच ही रझा अकादमी हे महाविकास आघाडीचंच चौथं पिल्लू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.