मुंबई - शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांचा राजकीय संघर्ष आणि आरोप प्रत्यारोप आता महाराष्ट्राच्या परिचयाचे झाले आहेत. दरम्यान, नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेच्या कोरोनाकाळातील नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. महाविकास आघाडी सरकारने आणि मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं आहे, आशी टीका नितेश राणेंनी या पत्रामधून केली आहे. आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या या पत्रात नितेश राणे म्हणतात की, कोरोना काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. या कठीण काळात महाविकास आघाडी सरकारने व मुंबई महानगर पालिकेत असलेल्या सत्ताधारी सेनेने आपल्या नियोजनाचा अभाव आणि अनाठायी निर्बंधातून सामान्य जनतेला मेटाकुटीला आणलं आहे. दवाखान्यांत लागणाऱ्या आगी, ऑक्सिजनअभावी तडफडून मेलेली जनता, ऑक्सिजन गळती यामुळे आरोग्य सेवेचे पुरते धिंडवडे निघाले. परंतु अशाही प्राप्त परिस्थितीत फ्रंटलाईन वर्कर, कोविड वॉरिअर्सनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता सामान्य नागरिकांची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या नशिबी मात्र आघाडी सरकारने फक्त फरफट आणून ठेवली.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारी वेळवर नाही म्हणून त्यांना आंदोलनं करावी लागली. सरकार साधं विम्याचं कवचही कर्मचाऱ्यांना व फ्रंटलाईन वर्कर्सना देऊ शकलं नाही. जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या फक्त घोषणाच झाल्या. ज्या फ्रंटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचं भांडवलं करत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला, त्याच फ्रंटलाईन वर्कर्सच्या दुसऱ्या लसीकरणाचा टप्पा सत्ताधारी सेनेला पूर्ण करता आलेला नाही. २६ जानेवारीपासून मुंबईत पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यात आली होती. परंतु या कर्मचाऱ्यांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, करोनाशी दोन हात करणाऱ्या सुमारे ९४ हजार आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांचे दोन डोस झालेले नाहीत! ही अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली.
आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करच्या लसीकरणाची मोहिम हाती महापालिकेने हाती घेतल्यानंतर ७ लाख ५६ हजार ५३९ जणांचे लसीकरण झाले. यातील फक्त ४ लाख २५ हजार ४६४ जनांचा केवळ पहिलाच डोस झाला आहे. तर त्यातील केवळ ३ लाख ३१ हजार ७५ जणांचेच दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजे ९४ हजार ३८९ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सचा फक्त एकच डोस झाला आहे. मुंबई महानगर पालिका आपल्याचं कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसविषयी हलगर्जी व उदासीन आहे. हा विरोधाभास पालिका प्रशासनातील गोंधळच दर्शवतो.
आपल्या नाकर्तेपणाचं सगळं पाप झाकण्यासाठी सगळं खापरं कोरोनावर फोडायचं आणि फ्रंटलाईन वर्कर्संनी केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेनं मिरवायचं असं स्वार्थी धोरण सत्ताधारी सेनेना राबवत आहे, हे अत्यंत निंदनीय आहे . कालच आपण महाविकास आघाडी सरकारची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळत करोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत मुंबई महापालिकेत आढावा बैठक घेतली. पण मला खात्री आहे की ही वस्तूस्थिती आपणापासून लपवली गेली असेल. म्हणूनच मी हे वास्तव आपल्या निर्दशनास आणून देऊ इच्छीतो. जेणेकरून महानगर पालिकेचे फ्रंटलाईन वर्कर तथापी आरोग्य कर्मचारी यांना संशय निर्माण ना होवो की ठाकरे सरकार हे त्यांच्यासोबत संधीसाधूपणाचं राजकारण तर करत नाही ना? असा सवाल नितेश राणेंनी पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.