सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या आश्वासनानंतर डंपर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह ४० जणांना जामीन मंजूर झाला आहे.डंपर चालक-मालक यांच्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून येथील शासकीय मालमत्तेचे नुकसान व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी शनिवार ५ मार्च रोजी आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, दत्ता सामंत यांच्यासह एकूण ४० आरोपींविरूद्ध पोलिसांनी भा. द. वि. कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३३२, ३५३, ४४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. ६ मार्च रोजी यातील काही व त्यानंतर काहीजणांना कणकवली न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुरुवारी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. हुद्दार यांच्या न्यायालयासमोर हजर केले गेले. त्यांना सशर्त जामीन मंजूर केला. पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली असली तरी नीतेश राणे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात सवलत दिली.आंदोलन मागे डंपर चालक मालकांचे व्यावसायिक प्रश्न आम्हाला जास्त महत्वाचे असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिला. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतल्याचे कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सांगितले.
नितेश राणेंना जामीन
By admin | Published: March 11, 2016 3:59 AM