नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी या चित्रपटावरून सध्या देशभरात मोठा राजकीय गदारोळ माजला आहे. त्यातच महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते आणि भाजपाचे नेते या चित्रपटावरून आमने सामने आले आहेत. द केरला स्टोरी हा चित्रपट केरळची बदनामी करणारा आहे. या चित्रपटाचा निर्माता कुणीही असो त्याला सार्वजनिकपणे फाशी दिली गेली पाहिजे, असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्याला आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड लटकवण्याची भाषा करत असतील तर आम्हालाही फटकवण्याची भाषा करता येते, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
नितेश राणे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, केरला स्टोरीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी काल जास्त वळवळ केली. फाशी देण्याची भाषा केली. जर लटकवण्याची भाषा जितेंद्र आव्हाड करत असतील. तर आम्हालाही फटके देण्याची भाषा चांगल्या पद्धतीने करता येते. हे लक्षात ठेवा, असे नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये आता हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. आता तुमचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही आहेत. आता काय तुमचे अल्पसंख्याक मंत्री नाही आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने अडीच वर्षे हिंदूंना टार्गैट करून, जे हिंदूंवर हल्ले घडवून आणलेत. तशी परिस्थिती आता महाराष्ट्रात राहिलेली नाही आहे.महाराष्ट्रात एक सक्षम गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बसले आहेत. बाळासाहेबांना मानणारा कडवट हिंदुत्ववादी म्हणून एकनाथ शिंदे बसले आहेत. त्यामुळे तुमची ही लटकवण्याची भाषा मुंब्र्यामध्येही चालणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
आमचा कायद्यावर विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. गृहमंत्रालय या वक्तव्यावर कारवाई करेल, अशी खात्री आहे. पण त्या केरला स्टोरीच्या प्रोड्युसर, डायरेक्टरच्या नखालाही धक्का लागला तर, आम्ही आव्हाडांसारख्या जिहादी विचारांच्या लोकांची महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर काय अवस्था करू, त्यावर पण एक चित्रपट निघेल, हे लक्षात ठेवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आहे. पण लटकवण्याची भाषा केली तर फटकवण्याची भाषा करू, हिंदूंच्या विरोधात कुणीही षडयंत्र रचलं तर आम्ही आक्रमक उत्तर देऊ, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.