नागपूर - शिवसेनेचे ठाण्यातील वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनी बंडांचा झेंडा फडकवल्यानंतर काही मंत्र्यांसह अनेक आमदारही त्यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. त्यातील एक आमदार नितीन देशमुख यांना हाट अॅटॅक आला असून, त्यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आले होते. मात्र एकनाथ शिंदेंसोबत सूरतपासून गुवाहाटीपर्यंत प्रवास केल्यानंतर अचानक नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून महाराष्ट्रात परतल्यानंतर नितीन देशमुख यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत गंभीर आरोप केला आहे.
नागपूरला परतल्यावर नितीन देशमुख प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. रुग्णालयात नेल्यावर २० २५ जणांनी जबरदस्तीने पकडून माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणते होते काय होते मला माहिती नव्हतं. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचं षडयंत्र त्या लोकांचं होतं. त्यामागे त्यांचा काय हेतू होता, हे मला माहिती नाही. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आणि शेवटपर्यंत त्यांचाच शिवसैनिक राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमचे मंत्री होते त्यांच्यासोबत मी गेलो होतो. त्या दिवशी रात्री तीन वाजता हॉटेलातून मी निघालो. १००-२०० पोलीस माझ्या मागे होते. एखाद्या वाहनात बसण्याचा प्रयत्न मी केला, पण मला कुणी बसायला दिलं नाही. त्यानंतर पोलिसांनी मला पकडून रुग्णालयात नेले. तिथे मला हार्ट अॅटॅक आल्याचे नाटक रचण्यात आले. अॅटॅक आल्याचे सांगून ते माझ्या शरीरावर काही प्रक्रिया करून माझा घात करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ईश्वर कृपेने मी सुखरूप राहिलो, असा धक्कादायक दावा नितीन देशमुख यांनी केला.