अहमदनगर : खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे याचा गळा आवळून खून झाल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरणारे आणि घटनेचे प्रत्यक्ष १३ साक्षीदार फितूर झाल्याने आरोपी निर्दोष सुटले, अशी माहिती सरकारी वकील रामदास गवळी यांनी सोमवारी दिली.फितूर साक्षीदाराविरोधात कारवाईसाठी न्यायालयात अर्ज करणार असून, निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी प्रस्ताव तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. गवळी म्हणाले, खटल्यात २६ साक्षीदार होते़ त्यापैकी नितीनला मारहाण करताना व खून करताना पाहणाराच साक्षीदार फितूर झाला़ २६ पैकी नितीनचे आई-वडील, दोन बहिणी, दोन डॉक्टर, फोटोग्राफर, तपास अधिकारी व पंचनामा करणारे पोलीस कर्मचारी यांनीच साक्ष दिली़ खटल्यातील ८ साक्षीदारांचा न्यायदंडाधिकाºयांसमोर जबाब झाला होता़ तेही फितूर झाले़ १३ फितूर साक्षीदारांमध्ये नितीनच्या एका नातेवाइकाचाही समावेश आहे.अशोक विठ्ठल नन्नवरे, रावसाहेब उर्फ बबलू अण्णा सुरवसे, लखन अशोक नन्नवरे, सदाशिव मुरलीधर डाडर, विष्णू गोरख जोरे, राजेंद्र बाजीराव गिते, बाळू ज्ञानेश्वर गिते, रमेश भगवान काळे (यांचा १६४ चा जबाब झाला होता), सदाशिव आश्रुबा होडशिळ, विकास कचरू डाडर, हनुमंत परमेश्वर मिसाळ, राजू सुदाम जाधव व साधना मारुतीराव फडतरे हे फितूर झाल्याचे गवळी यांनी सांगितले़खर्डा येथे बारावीतील मागासवर्गीय समाजातील नितीन राजू आगे याचा प्रेमप्रकरणातून २८ एप्रिल २०१४ रोजी १० ते १५ जणांनी खून केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. खर्डा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून ओढत नेऊन त्याला मारहाण करून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह झाडाला लटकविण्यात आला होता, असे गुन्ह्यात नोंद केले होते.
नितीन आगे खून खटला : फितूर झालेल्या साक्षीदारांवर कारवाईसाठी अर्ज करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:44 AM