औरंगाबाद : खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करणा-या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात सरकार पक्षाने शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले.या खटल्यासंदर्भातील ‘फौजदारी जनहित याचिके’च्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे दोन दिवसांत अपील दाखल करण्यात येईल, असे निवेदन खंडपीठात करण्यात आले होते. नितीन आगेच्या शवविच्छेदन अहवालात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली नसून त्याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी डॉ. युवराज कराडे व डॉ. संजीव मुंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावर मारहाणीच्या आठ जखमा आढळल्या. त्याला काठी आणि हतोडीने मारहाण केल्याचे समोर आले. नितीनची आई रेखा, बहीण रूपाली सोनुने व दुर्गा आगे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे.नितीनला शाळेत मारहाण करण्यात आली असून, कान्होबा मंदिराजवळ तो पडल्याची माहिती आरोपींनी नितीनच्या आईला दिली होती, तर ‘नितीनचे कामच केले आहे,’ असे आरोपीने दोन्ही बहिणींना सांगितले होते. हे मुद्दे युक्तिवादासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आरोपींकडून काठी व हतोडी जप्त करण्यात आली आहे. नितीनचे ओळखपत्र व मोबाईल आरोपींनी लपवून ठेवले होते.२६ पैकी १४ साक्षीदार फितूरबारावीत शिकत असलेल्या नितीनची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. नितीनचे त्याच्या शाळेतील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी नितीनला मारहाण करून त्याची हत्या केली होती, अशी फिर्याद त्याचे वडील राजू आगे यांनी दिली होती. २६ पैकी १४ साक्षीदार फितूर झाले आहेत. हत्या प्रकरणात सचिन गोलेकर, शेषराव येवले, नीलेश गोलेकर, विनोद गटकळ, भूजंग गोलेकर यांच्याविरुद्ध हत्या करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते.
नितीन आगे खून खटला; शासनाचे अपील दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:12 AM