नागपूर: दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्याचं उड्डाण रद्द करण्यात आलं. याच विमानातून काही प्रवाशांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रवास करणार होते. मात्र ही बाब योग्य वेळी वैमानिकाच्या लक्षात आली. त्यामुळे त्यानं विमानाचं उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विमान धावपट्टीवरुन टॅक्सीवेकडे नेण्यात आलं. आज संध्याकाळी दिल्लीत दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्र सरकारमधील अनेक मंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचसाठी नितीन गडकरी दिल्लीला जात होते. मात्र ऐनवेळी विमानात बिघाड झाल्याचं समजल्यानं त्यांनी विमानतळाहून घरी परतण्याचा निर्णय घेतला. नागपुरातून दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेले इंडिगोचे 6ई 636 विमान तांत्रिक कारणांमुळे धावपट्टीवरून दोनदा परतले. सकाळी 9.30 वाजता पहिल्या उड्डाणावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विमानात होते. पहिल्यांदा विमान रद्द झाल्यानंतर गडकरी विमानातून उतरून घरी परतले. यानंतर पुन्हा 10.45 वाजता विमानानं उड्डाणाचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला.