मुंबई : राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची समिती नेमून दर महिन्याला आढावा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रम एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राला आपले नेहमीच प्राधान्य राहील, अशी ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यासह केंद्र, राज्य शासनाचे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील. राज्याकडील, प्राधिकरणाकडील प्रलंबित विषय सोडविण्यासाठी समिती पाठपुरावा करेल.भारतमाला अंतर्गत महाराष्ट्रासाठी सुमारे ३ हजार किमीच्या रस्ते कामांना मंजुरी दिली आहे. येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणाºया नव्याने घोषित १०४ राष्ट्रीय महामागार्साठीही पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या सुरू असलेल्या कामांचे सुमारे १३०० कोटी रुपये निधी प्रलंबित होते. त्यातील ७०० कोटींच्या निधीचे कालच वाटप झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यातील कामांना केंद्राकडून भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले.गोंदिया ते बडनेरा, बडनेरा ते रामटेक व नरखेड ते वडसा या मार्गावर लवकरच ब्रॉडगेज मेट्रो सुरू होईल. चार डब्यांची वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो उभारणीचा खर्च कमी असून वाहतूक जलद होईल. त्यामुळे राज्य शासनाने पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर आदी मार्गावरही ही मेट्रो सुरू करण्याचा विचार करावा, अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांना मिळाला नितीन गडकरी यांचा बूस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 6:29 AM