भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं. त्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विशेषकरून ठाकरे गटाकडून भाजपावर जोरदार टीका होत आहे. दिल्लीत असलेल्या नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्याचं कारस्थान सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला आता महाराष्ट्र भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नितीन गडकरी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्यासारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असा टोला भाजपाने संजय राऊतांना लगावला आहे.
याबाबत सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भाजपाने म्हटले आहे की, संजय राऊत यांना नैराश्याने ग्रासलेले आहे. ते रोज काहीही बडबडतात.अलीकडे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांचा राग येत नाही तर त्यांची कीव येते, असा टोला भाजपाने लगावला आहे.
महाविकास आघाडीचे जागा वाटप अडलेले आहे. त्यांच्यात भांडणे सुरू आहेत. या भांडणाचे मुख्य कारण संजय राऊत हेच आहेत, ते आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचा अपमान करतात. त्यांना धमकावतात. नेत्यांवर चिडचिड करूनही त्यांचे मन शांत होत नाही. म्हणून मग ते बैठकीत चहा देणाऱ्या वेटरवर खेकसतात. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व नेते त्यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत, असा दावाही भाजपाने केला आहे.काल संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना ‘ हट्ट करू नका‘ असा इशारा देत त्यांचा अपमान केला. एकूणच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळलेले आहे आणि त्यांना तातडीने उपचाराची गरज आहे, असा सल्लाही भाजपाने दिला आहे.
आज संजय राऊत यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. पण राऊत हे विसरले आहेत की, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की, या पक्षातील सामान्य कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो आणि तो देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकतो. संजय राऊत ज्यांची चाकरी करतात त्या उबाठा मध्ये केवळ घरकोंबडा बाप आणि त्याचा ३३ वर्षाच्या मुलालाच पद आणि सन्मान मिळतो. इतरांच्या वाट्याला केवळ मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर अपमान येतो. तसेच आदरणीय नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. गडकरी साहेबांचे कर्तृत्व मोठे आहे. संजय राऊत यांच्या सारख्या घरगड्यांनी त्यांची चिंता करू नये, असा टोलाही भाजपाने लगावला.