पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील सिंहगड परिसरात धर्मादाय रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी यांनी त्यांचा आणि रतन टाटा (Ratan Tata) यांचा एक जुना किस्सा सांगितला.
रतन टाटांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटननितीन गडकरी महाराष्ट्रातील तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळेसचा एक किस्सा गडकरींनी सांगितला. ते म्हणाले की, "औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख के.बी. हेडगेवार यांच्या नावाने रुग्णालयाचे उद्घाटन होणार होते. मी तेव्हा राज्य सरकारमध्ये मंत्री होतो. तेव्हा RSS च्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलचे उद्घाटन रतन टाटा यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली."
रतन टाटांनी विचारला प्रश्नगडकरी पुढे म्हणाले की, "त्यानंतर मी रतन टाटांशी संपर्क साधला आणि त्यांना औरंगाबादला येऊन हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यासाठी राजी केले. पण, रुग्णालयात पोहोचल्यावर टाटांनी मला एक प्रश्न विचारला. टाटा म्हणाले की, हे रुग्णालय फक्त हिंदू समाजातील लोकांसाठी आहे का? त्यावर मी त्यांना म्हणालो- तुम्हाला असे का वाटते?"
"त्यावर टाटा म्हणाले- कारण हे रुग्णालय RSS चे आहे. त्यावर मी त्यांना सांगितले की, हे रुग्णालय सर्व समुदायांसाठी आहे. या रुग्णालयाला सरसंघचालकांचे नाव दिले असले तरी, सर्व समाजातील लोक इथे उपचार घेऊ शकतात. आरएसएसमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. त्यावर टाटा खुश झाले आणि आनंदाने रुग्णालयाचे उद्घाटन केले."