Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेवर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय नाट्य रंगले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटीलला पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक केली आहे तर आपटे नावाचा दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर माफी मागितली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात याबाबत वक्तव्य केले.
"मोठ्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर केला जायला हवा. माझा विभाग जेव्हा मुंबईत ५५ फ्लायओव्हर बनवत होता, तेव्हा एका व्यक्तीने मला मूर्ख बनवलं होतं. त्याने हिरव्या रंगाचे पावडर कोटींग करुन लोखंड दाखवलं आणि म्हणाला की याला गंज लागणार नाही. मी विश्वास ठेवला, ते लोखंड वापरलं आणि गंज पकडला. जिथे ३० किलोमीटरचा भाग समुद्राच्या बाजूला आहे तिथे स्टेनलेस स्टील वापरण्यावाचून पर्याय नाही. जर शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर तो कोसळला नसता," असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटले.
मुंबईचेच उदाहरण घेतले तर समुद्राच्या बाजूला कितीही चांगलं काम केलं तरी फार पटकन त्या गोष्टींना गंज लागतो. त्यामुळे कोणत्या गोष्टींचा वापर करायला हवा हे नीट ठरवून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या विभागात खडक आणि दगड आहेत तेथे तुम्हाला मोठ्या क्षमतेची ड्रील मशिन आणि बोरिंग मशीन लागतील. पण जेथे मातीचा भाग आहे तेथे तितक्या मोठ्या क्षमतेची गरज नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचा अभ्यास करुन बांधकाम करायला हवे," असा सल्ला त्यांनी दिला.