औरंगाबादमधील दीक्षांत समारंभातील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यभरात कोश्यारींविरोधात विरोधकांनी थयथयाट सुरु केला आहे. विरोधकच नाहीत तर शिवाजी महाराजांच्या तीन वंशजांनी सुद्धा यावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या कार्यक्रमामध्ये कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत शिवाजी महाराजांची तुलना केली होती. यावरून राज्यपालांना केंद्राने बोलावून घ्यावे, राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवावे आदी मागण्या विरोधक करू लागले आहेत. या साऱ्या गदारोळात गडकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत या कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ''शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. आमच्या आईवडिलांपेक्षा देखील महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचे जीवन आमचे आदर्श आहे. यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, जाणता राजा. निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी !! डीएड बीएड कॉलेज करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता'', असे म्हणतानाचा व्हिडीओ गडकरी यांनी पोस्ट केला आहे.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. यावरून वाद निर्माण झाला आहे.