ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 26 - भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्यासाठी विरोधक पक्षात आले पाहिजेत. त्यांना आम्ही गुणदोषांसह स्वीकारतो. अगदी गुन्हेगार असलातरी पक्षाच्या परीस स्पर्श झाल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी करण्याचा आम्हाला विश्वास आहे, असे विधान केंद्रीय रस्ते व विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठकीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी झाले. या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे अध्यक्षस्थानी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट , शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राजमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी राकेश सिंग, व्ही़ सतीश, माजी मंत्री एकनाथ खडसे, शहाराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.
गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देण्याचे समर्थन करताना गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यकत्र्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ""एकेकाळी कुप्रसिध्द असलेला हा कार्यकर्ता पक्षात आल्यानंतर चांगला झाला. त्यामुळे आम्ही गुणदोषांसह नवीन कार्यकत्र्याना स्वीकारतो. परंतु, गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात कधीही गुन्हेगारांची बाजू घेतलेली नाही. आता जुन्या कार्यकत्र्याची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांनी नवीन कार्यकत्र्याचा मोठय़ा मनाने स्वीकार केला पाहिजे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्या पक्षात आल्याशिवाय आपला पक्ष वाढणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. विरोधकांना बरोबर घेऊन आपल्यासारखे बनविले पाहिजे.""
विजयाचा अहंकार, उन्माद नको !
भाजपाला नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्याचा उन्माद येऊ न देता, त्याचा नम्रपणो स्वीकार केला पाहिजे. आत्मविश्वास बाळगा, पण अहंकार पाळू नका. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्याचे उत्तरदायित्त्व ठेऊन संकल्प करा. देशातील व राज्यातील दलित, अदिवासी, शेतकरी व दिव्यांग यांच्या कल्याणासाठी काम करा. अर्थिक व सामाजिक विषमता दूर झाले पाहिजे, यासाठी कार्यकत्र्यानी काम करावे, असा सल्ला गडकरी यांनी कार्यकत्र्याना दिला.
त्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत
राज्यात 36 हजार कोटींची सिंचनाचे प्रकल्प सुरू आहेत. 50 टक्के शेती क्षेत्र सिंचनाखाली आल्याशिवाय शेतक-यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. गेल्या 3क् वर्षात सत्ता असूनही विरोधकांना सिंचन क्षेत्र वाढविता आले नाही. शेतक-यांऐवजी त्यांनी परिवाराचा विचार केला. परंतु, राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर कृषी विकास दर 12.5 टक्केर्पयत वाढला आहे. येत्या दोन वर्षात हा विकास दर 20 टक्के करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे गडकरी यांनी सांगितले.