वर्धा – अनेकदा राजकारणात कुणीही कुणाचं कायमच शत्रू नसतं तर कुणीही मित्र नसतं. राजकारणात चढउतार पाहायला मिळतात. परंतु राजकारणात काही नेते असे आहेत जे सर्व नेत्यांची जुळवून घेतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात. काही मोजकेच नेते आहेत ज्यांच्याबाबत हे उदाहरण लागू पडतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांच्याबाबत असाच काहीचा प्रकार वर्धा येथे ऐकायला मिळाला.
माजी खासदार दत्ता मेघे(Datta Meghe) यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. मृत्यूपत्रात कुठलाही घोळ होऊ नये यासाठी माझ्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin GadkarI) यांचे नाव लिहिल्याचा गौप्यस्फोट मेघे यांनी जाहीरपणे केला. नगरपालिकेच्या विकासकामांचे ई भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात मेघे यांनी ही गोष्ट उघड केल्याने अनेकांसाठी तो चर्चेचा विषय बनला आहे.
काय म्हणाले दत्ता मेघे?
माझे सर्व पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. नितीन गडकरी हे आमच्या कुटुंबातील महत्त्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये यासाठी त्यांचे नाव दिलं आहे. एका राजकारण्यानं ज्या पक्षात स्वत:ची हयात घालवली त्या पक्षातील अथवा स्वत:च्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचं मृत्यूपत्रात नाव नाही परंतु ज्या पक्षात नव्याने सहभागी झालो तेथील नेत्याचे नाव घेतलं ही आश्चर्याची गोष्ट आहे. दत्ता मेघेंनी मृत्यूपत्रात नितीन गडकरींचे नाव का आणि कशासाठी लिहिले आहे? याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. मात्र मेघेंच्या या विधानानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.
एरव्ही राजकारणात नेहमी एकमेकांवर टीकेचे बाण चालवणारे नेते, पक्षांतर करणारे नेते यावर अजिबात विश्वास ठेवला जात नाही. राजकारणात कधीही काहीही घडू शकते परंतु मृत्यूपत्रात एखाद्या नेत्याचं नाव लिहिण्याइतपत राजकीय नेत्यांचा एकमेकांवर विश्वास असतो का? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे. मेघेंनी स्वत:च्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं नाव घेण्याऐवजी नितीन गडकरींचे नाव का घेतले असावे? नितीन गडकरींवर मेघेंना इतका विश्वास का? अशी चर्चाही लोकांमध्ये चांगलीच रंगू लागली आहे. दत्ता मेघे ४ वेळा काँग्रेसमधून लोकसभेत निवडून गेले होते तर एकदा राज्यसभेवर काँग्रेसनं त्यांची वर्णी लावली होती. राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर दत्ता मेघेंनी भाजपात प्रवेश केला.