नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी हे त्यांच्या कामामुळे नेहमीच कौतुकाचे धनी होतात. तर, अनेकदा आपल्या भाषणातील स्पष्टवक्तेपणा आणि स्वत:च्याच सरकारला दिलेल्या घरच्या अहेरमुळेही चर्चेत असतात. नुकतेच त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्याला त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. आज गावातील गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत, असे त्यांनी म्हटल्याचे दिसून येते. आता, या व्हिडिओबद्दल पीआयबीने फॅक्ट चेक सांगत खुलासा केला आहे.
नितीन गडकरींच्या या व्हिडिओतून मोदी सरकारमधील मंत्रीच मोदी सरकारची पोलखोल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आशयाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असून काँग्रसनेही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनीही हा व्हिडिओ शेअर केल्याने गडकरींच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, सद्य:स्थितीशी जोडणारा हा दिशाभूल करणारा व्हिडीओ आहे. त्यांनी केलेले हे विधान चुकीच्या पद्धतीने शेअर करण्यात आले आहे. विद्यमान सरकार सत्तेत येण्यापूर्वी ग्रामीण भागातील परिस्थितीचं वर्णन त्यांनी केलं होतं. त्यामुळे असे दिशाभूल करणारे व्हिडीओ तपासल्याशिवाय शेअर करू नका, असे आवाहन पीआयबी फॅक्टचेकने केले आहे.
अर्धाच व्हिडिओ व्हायरल
नितीन गडकरींचा हा व्हिडिओ २९ फेब्रुवारी २०२४ रोजी द लल्लन टॉप या युट्यूब चॅनेलवर प्रसारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्याला त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. आज गावातील गरीब, मजूर, शेतकरी दु:खी आहेत. गावात चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत, असे त्यांनी म्हटल्याचे दिसून येते. मात्र, हा त्यांचा अर्धाच व्हिडिओ आहे. भाजपाने ग्रामीण क्षेत्रात खूप कामे केली आहेत. पण, अद्यापही तिथपर्यंत तितका विकास झाला नाही, जेवढा इतर भागात झाला आहे, असे ते पुढे म्हणतात. तसेच, पुढे सरकारने केलेल्या विकास कामांबाबतही सांगताना दिसून येतात.
काँग्रेस नेत्यांना नोटीस
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि महासचिव जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ अर्धवट असून जनतेची दिशाभूल करणारा असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच, दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणीही या कायदेशीर नोटीसमधून करण्यात आली आहे.
व्हिडिओत काय म्हणाले गडकरी
गडकरी म्हणाले की, ज्या प्रमाणात इतर क्षेत्रामध्ये विकास झाला, तेवढा शेतीत झाला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्हीही यासाठी खूप काम केले. ५ लाख कोटींचे इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन जरी शेतकऱ्यांनी उत्पादित केले, तर आपल्या देशातला शेतकरी सुखी, समृद्ध होईल. गावागावांत रोजगार निर्माण होईल, असे गडकरींनी म्हटले. दरम्यान, गडकरींचा हा व्हिडिओ अर्धवट कट करुन शेअर करण्यात आला आहे. पूर्ण व्हिडिओत गडकरी म्हणतात की, भाजपाने ग्रामीण क्षेत्रात खूप कामे केली आहेत. पण, अद्यापही तिथपर्यंत तितका विकास झाला नाही, जेवढा इतर भागात झाला आहे, असे गडकरी सांगत आहेत.