नवी मुंबई: नवी मुंबई स्पोटर््स असोसिएशन (एनएमएसए) या वाशीतील सर्वात जुन्या क्लबच्या संचालक मंडळाने सिडकोच्या अधिकाऱ्यांवर मेहरनजर दाखवत त्यांना अगदी स्वस्तात क्लबची मेंबरशिप दिली आहे. त्यामुळे क्लबला जवळपास शंभर कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप क्लबच्या काही सदस्यांनी केला आहे. या घटनेने शहरातील प्रतिष्ठित म्हणून ओळखला जाणारा एनएमएसए क्लब वादात सापडला आहे. असे असले तरी क्लबचे कार्यकारी सचिव नामदेव आल्हाट यांनी सदस्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. एनएमएसए या क्लबची ३0 वर्षांपूर्वी स्थापना झाली. सिडकोने केवळ शंभर रुपयांच्या लीजवर क्लबला ही जागा उपलब्ध करून दिली होती. गेल्या तीन दशकांत या क्लबचा पसारा वाढला आहे. खेळांच्या उत्तम सुविधा, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आदींसह क्लबने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक या क्लबचे मेंबर आहेत. मागील काही वर्षांपासून क्लबची मेंबरशिप घेणाऱ्यांचा ओढा वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या क्लबचे सुमारे १0 हजार सदस्य आहेत. त्यामुळे क्लबच्या उपलब्ध सुविधांवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक सदस्यांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने गेल्या नोव्हेंबरपासून मेंबरशिपच्या रकमेत वाढ केली आहे. त्यानुसार आजीव सदस्यत्वासाठी २0 ते २२ लाख तर सर्वसाधारण सदस्यासाठी पाच लाख रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. परंतु या नियमाला बगल देत क्लबच्या व्यवस्थापकीय समितीने सिडकोच्या अधिकाऱ्यांना ५0 हजारांत आजीव तर २५ हजारांत सर्वसाधारण सदस्यत्व देवू केले आहे. सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या पत्रानुसार क्लबच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे. सिडकोने आपल्या अधिकाऱ्यांना सवलतीच्या दरात ५0 आजीव व ५0 सर्वसाधारण गटातील सदस्यत्व द्यावेत, असे क्लबला कळविले होते. क्लबच्या कार्यकारी समितीवर सिडकोचे तीन स्वीकृत संचालक आहेत. समितीच्या बैठकीत त्यांनीही याबाबत आग्रह धरला होता. त्यानुसार समितीने हा निर्णय घेतला आहे. परंतु कार्यकारी समितीच्या या निर्णयाला काही सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
एनएमएसएची सिडकोवर मेहरनजर?
By admin | Published: April 26, 2016 2:51 AM