मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात व धर्माबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयात विविध कागदपत्रेदेखील सादर केली. मात्र एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार, समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचून दाखवत वानखेडे जे म्हणत आहेत ते बरोबर असल्याचे सांगितले.समीर वानखेडे यांनी वडिलांनी स्वीकारलेला मुस्लिम धर्म न स्वीकारता १८ वर्षांनंतर त्यांच्या आजी-आजोबांचा हिंदू धर्म स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. वयात आलेल्या मुलाने त्याच्या आजी-आजोबांची संस्कृती व परंपरा मान्य केली तर त्यात काहीच बेकायदा नाही, असे आंबेडकर म्हणाले. यासंदर्भात केरळ येथील एका व्यक्तीच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता, तो निकाल आंबेडकर यांनी माध्यमांसमोर वाचून दाखविला.केरळ येथील ती व्यक्ती आपल्या आईवडिलांच्या ख्रिश्चन धर्मापासून वेगळे होऊ पाहत होती. या व्यक्तीच्या आईवडिलांनी त्याच्या जन्माच्या आधी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र आजी-आजोबांचा असलेला धर्म स्वीकारायचा असल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे होते. याप्रकरणी २५ फेब्रुवारी २०१५ रोजी न्यायालयाने त्या व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला होता. या कायद्यानुसार वानखेडेंवर कारवाई होणार नसल्याचे आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
कायद्यानुसार वानखेडेंवर कारवाई होणार नाही, प्रकाश आंबेडकर यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 8:29 AM