मुंबई: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी उमेदवारांची यादी पाठवल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. वंचितची यादी गणेश विसर्जनानंतर जाहीर होईल, असंदेखील ते म्हणाले. काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याची स्पष्ट भूमिका आंबेडकर यांनी घेतली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांनीकाँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल अल्टिमेटम दिला होता. त्यांनी काँग्रेसला 144 जागा देऊ केल्या होत्या. मात्र काँग्रेसला ही ऑफर मान्य नसल्यानं आघाडी होण्याची शक्यता मावळली. यानंतर आता आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं. 'काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता. मात्र काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वदेखील चर्चा करण्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचं या परिस्थितीत वारंवार स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीवेळी आलेला अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आला. काँग्रेस आघाडीसाठी उत्सुक आहे. मात्र वंचितच त्यासाठी तयार नाही, असं चित्र काँग्रेसकडून निर्माण केलं जात आहे', अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.काँग्रेससोबतच्या आघाडीबद्दल स्पष्ट भूमिका घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना एमआयएमसोबतची आघाडी कायम राहील अशी आशा आहे. जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याचा आरोप करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघासोबतची आघाडी संपुष्टात आल्याची घोषणा केली. मात्र आंबेडकर यांनी जलील यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. ओवेसी सांगत नाहीत तोवर आघाडी कायम असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:08 PM