कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : लोकशाही निवड प्रक्रियेत पाच वर्षांकरिता मतदार आपल्या आशा, आकांक्षा ठेवून मतदान करतो; मात्र मतदारांनी मतांची ठेव चांगल्या बँकेत ठेवली पाहिजे. नारायण राणेंची बँक दिवाळखोरीत आली आहे, त्यामुळे ती बुडीत आहे. तेथे मत ठेवले तर लुटले जाईल. आपले मत भाजपच्या बँकेत ठेवले तर पाच वर्षांत पाचपट विकास रूपाने आम्ही ते परत करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.कुडाळ येथे जाहीर सभेत ते बोलत होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ, मुंबई-गोवा महामार्ग, ६५० कोटी रुपयांचा सिंधुदुर्ग किल्ला आराखडा, रेल्वेने पश्चिम महाराष्ट्राशी जोडून वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. यातून रोजगाराच्या अनेक संधी स्थानिकांना उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्गवासीयांना दिली.केंद्र व राज्य सरकारच्या विचारांचे सरकार जिल्हा परिषदेवर आणा, असे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. आम्ही आधी करतो आणि नंतर बोलून दाखवितो, असा टोला सुरेश प्रभू यांनी यावेळी शिवसेनेला लगावला. (प्रतिनिधी)
राणेंच्या बुडीत बँकेत मतांची ठेव नको
By admin | Published: February 16, 2017 3:51 AM