बीड : १५ वर्षे मागील सरकारने स्वत:च्या तिजोरीचे सिंचन केले. आता हल्लाबोल मोर्चे काढून आमच्यावर आरोप केले जातात; परंतु ही डल्लामार यात्रा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते सरपंच मेळाव्यात बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून कर्जमाफीवरून आमच्यावर टीका केली जाते. आम्ही चुकतही असू; परंतु आमचे काम प्रामाणिक आहे. मागील १५ वर्षांत सरकारने काय दिवे लावले, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता विरोधकांनी हल्लाबोल करून जनतेची दिशाभूल करू नये. आमच्याकडेही भरपूर मालमसाला आहे. तो जर आम्ही बाहेर काढला तर हल्लाबोल काढणाºयांनाच स्वत:वर हल्ला करून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. कृष्णा खोºयातील पाणी मराठवाड्याला मिळत नव्हते. भाजप सरकार येताच केंद्राकडून त्याला मान्यता आणली. त्याप्रमाणे ३५० कोटींची मंजुरी घेऊन कामास सुरुवातही केली. चार वर्षांत मराठवाड्याला पाणी दिले जाईल, असेही फडणवीस म्हणाले....त्यांना पाणी पाजायचेयभाषण सुरू असताना फडणवीस यांनी सिक्युरिटीला पाणी मागितले. पंकजा मुंडे यांनी त्यांना पाणी दिले. पाणी पिऊन झाल्यावर त्यांनी हल्लाबोलवाल्यांना पाणी पाजायचेय म्हणून मी पाणी पिलो, असे फडणवीस म्हणाले.आंदोलकांना अटक : उसाला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे भाव मिळालाच पाहिजे, यासह इतर मागण्यांसाठी वडवणी तालुक्यातीलल पाच गावच्या नागरिकांनी सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले. मुख्यमंत्री फडणवीस येण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
हल्लाबोल नव्हे, डल्लामार यात्रा, मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:00 AM