पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशनचे २१४ शाखांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांना पाठवलेले पत्र हा अंतर्गत संवादाचा भाग आहे. आपण स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन पत्रात करण्यात आले होते. मात्र, पत्र जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आले. सरकारकडून किंवा पोलिसांकडून डॉक्टरांवर कोणतीही सेन्सॉरशिप लादण्यात आलेली नाही, असे आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ईमेलवरून संपर्क साधला असून, सायबर सेलकडे तक्रार नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.डॉक्टरांनी शासनाविरोधात आक्षेपार्ह विधाने करू नयेत, एखाद्या मुद्द्यावर चर्चा जरूर व्हावी, मात्र त्यातून भडकावू भाषा असू नये, असा सूचना देणारे पत्र २० एप्रिल रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यभरातील विविध शाखांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांना पाठवण्यात आले होते. महाराष्ट्र सायबर सेलकडून याबाबतच्या सूचना मिळाल्याचे पत्रात म्हटले होते. हे पत्र सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले आणि शासन डॉक्टरांची गळचेपी करत असल्याची चर्चा सुरू झाली. ही सर्व चर्चा निरर्थक असून सरकार किंवा पोलिसांकडून डॉक्टरांवर कोणतीही सेन्सॉरशीप लादण्यात आलेली नाही, असे भोंडवे यांनी नमूद केले.डॉ. भोंडवे यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'ते पत्र आयएमएच्या अंतर्गत संवादाचा भाग होते. डॉक्टरांनी स्वयंशिस्त कशा प्रकारे पाळावी, याबाबत त्यामध्ये चर्चा झाली. मात्र, पत्र खोडसाळपणे व्हायरल करण्यात आले. कोरोनाच्या संकटात आम्ही शासनाला पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्व यंत्रणा हातात हात घेऊन लढत आहेत. त्यामुळे शासनाकडून डॉक्टरांची गळचेपी होत असल्याची चर्चा निरर्थक आहे. याबाबत सायबर सेलकडे तक्रार करणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ईमेल वरून बोलणे झाले आहे.'
सरकार किंवा पोलिसांकडून डॉक्टरांवर कोणतीही सेन्सॉरशिप नाही : डॉ. अविनाश भोंडवे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 7:10 PM
शासनाकडून डॉक्टरांची गळचेपी होत असल्याची चर्चा निरर्थक
ठळक मुद्देयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ईमेलवरून साधला संपर्क