वाशिम: प्रसिद्ध साहित्यिक तसेच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ना. चं. कांबळे यांची बालभारतीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड करण्यात आली. वाशिम जिल्हय़ासाठी ही सन्मानाची बाब असून, वसंत आबाजी डहाके यांच्यानंतर दुसर्यांदा वर्हाडातील साहित्यिकाला हा बहुमान मिळाला आहे. ना. चं. कांबळे हे प्रसिद्ध साहित्यिक असून, त्यांच्या 'राघववेळ' या पुस्तकाला मराठी सारस्वतातील सन्मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. आजपर्यंत त्यांची ऊन- सावली, साजरंग, सिद्धार्थ यासह अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून, ती गाजलीही. यापूर्वीही त्यांनी साहित्य क्षेत्रातील अनेक पदे भूषविली आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तसेच अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्यही राहिले आहेत. सध्या ते विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष आहेत. बालभारतीचे पुणे येथे मुख्यालय असून, पाठय़पुस्तक निर्मिती करणे, शालेय अभ्यासक्रम ठरविणे आदी कामे बालभारतीच्या माध्यमातून करण्यात येतात. यापूर्वी अमरावतीचे वसंत आबाजी डहाके यांचीही बालभारतीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
ना. चं. कांबळे बालभारतीचे अध्यक्ष
By admin | Published: December 05, 2015 9:08 AM