पुणे : शाळा सुरू होण्यापूर्वीच स्कूलबसची तपासणी करून घेणे बंधनकारक असतानाही पुण्यातील तब्बल ८०० बसचालकांनी तपासणी करून घेतलेली नाही. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक बसने प्रादेशिक परिवहन विभागाकडून तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. परिवहन आयुक्तालयाच्या आदेशानुसार सुरुवातीला स्कूलबस तपासणीसाठी ३१ मेची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आरटीओने दोन वेळा मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत सर्व स्कूलबसची तपासणी करून घेणे आवश्यक होते. मात्र, स्कूल बस चालकांनी या मुदतवाढीचादेखील लाभ घेतला नाही. आरटीओकडे पुणे शहरातील २८५८ स्कूलबसची नोंद आहे. त्यापैकी दोन हजार ३६ स्कूल बसचालकांनी वाहन योग्यता तपासणी करून घेतली आहे. उर्वरित स्कूलबसची नोंदणी होणे बाकी आहे. आरटीओने या सर्व बसमालकांना नोटीस पाठविली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली. परवाना नसताना अवैधरीत्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबस चालकांवर आरटीओने जुलै महिन्यात कारवाई केली होती. त्यामध्ये सुमारे ३६८ वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १४० स्कूलबसकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले होते. ३० वाहने परवाना नसतानाही विद्यार्थी वाहतूक करीत असल्याचे दिसले होते.
स्कूलबसची नाही तपासणी
By admin | Published: August 23, 2016 1:07 AM