Marakadwadi News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनीही ईव्हीएम मशीनबद्दल आक्षेप घेत बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. तशी तयारीही ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. पण, प्रशासनाने ही निवडणूक रद्द केली. या प्रकरणावर आता निवडणूक आयोगाकडून खुलासा करण्यात आला आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकरवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी म्हटले आहे.
भांगळालकर यांनी निवडणूक प्रक्रियेबद्दल काय सांगितलं?
"मारकडवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक ९६, ९७ आणि ९८ अशी तीन केंद्रे येतात. या तीनही मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणतीही विसंगती आढळलेली नाही. मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांचे 'पोलिंग एजंट' उपस्थित होते आणि त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आलेली नाही", असे भांगळालकर यांनी सांगितले.
"मतमोजणीच्या वेळी देखील उमेदवारांचे 'काउंटिंग एजंट उपस्थित होते. त्यांच्याकडूनही मतमोजणी दरम्यान किवा नंतरही कोणताही आक्षेप नोंदवण्यात आलेला नाही. तसेच फेरमतमोजणीची कोणतीही मागणी झाली नाही. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पारदर्शकपणे पार पडल्यानंतरच निकाल घोषित झाला आहे", असे निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी सांगितले.
उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान चाचणी
निवडणूक अधिकारी भांगळालकर म्हणाल्या, "निवडणुकीशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधींना सहभागासाठी नियमानुसार वेळोवेळी कळवले गेले होते. यानुसार उमेदवाराचे प्रतिनिधि निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागीसुद्धा झाले होते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुकीपूर्वी आणि मतदानाच्या दिवशी मतदानापूर्वी चाचणी मतदानही घेतले गेले, मतदानयंत्रांच्या फर्स्ट लेवल चेक (FLC) आणि कामिशनिंग ह्या टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चाचणी मतदान घेतले आहे."
"मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान यंत्रावर ५० मताची चाचणी घेतली गेली. या कोणत्याही टप्प्यावर संबंधितांकडून कोणत्याही तक्रारी वा आक्षेप नोंदवले गेलेले नाहीत. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकंदर मतदान, मतमोजणी आणि निकाल प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा विसंगती आढळली नाही", अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांनी दिली.