मुंबई: कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव केल्यामुळे विरोधकांना नवसंजीवनीच मिळाली आहे. कर्नाटकातील निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेग आला आहे. यासंदर्भात रविवारी सायंकाळी शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली, त्यात संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चौहान, सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती. या बैठकीत कर्नाटकात भाजपचा पराभव कसा आणि का झाला यावर विशेष चर्चा झाली. यासोबतच या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली, जसे की महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि वज्रमूठ सभा. या बैठकीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढतील आणि त्यावर काही दिवसांत सर्व पक्षांशी बसून चर्चा केली जाईल यावरही बोलणे झाले.
कर्नाटकच्या निकालाने मार्ग दाखवला : शरद पवार
बैठकीनंतर शरद पवार म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीच्या निकालाने एक मार्ग दाखवला आहे. समविचारी राजकीय पक्षांनी एकत्र यावे. एखाद्या राज्यातील निवडणुकीत राजकीय पक्ष चांगली कामगिरी करू शकला, तर त्या राजकीय पक्षाला तेथे मदत करावी लागेल. एखाद्या राज्यात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र लढण्याची गरज भासली तर ते तिथे एकत्र लढावीत. आपल्याला दोन्ही प्रकारे काम करावे लागेल. एक समान किमान कार्यक्रम बनवावा लागेल, असे शरद पवार म्हणाले.
कर्नाटक जिंकला तसा महाराष्ट्रही जिंकणार : राऊतदुसरीकडे, संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकात केवळ काँग्रेस जिंकली नाही, तर देशातील संपूर्ण विरोधक जिंकले आहेत. याबाबत आम्ही अंतर्गत चर्चाही केली आहे. न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे. जसा कर्नाटक जिंकला तसा महाराष्ट्र जिंकणार. आगामी काळात जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. शांततापूर्ण सीट वाटप होईल, असं राऊत म्हणाले.