मुंबई : एमपीएससीची रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी गुरुवारी दीर्घ चर्चा केली. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा बैठकीनंतर मराठा नेत्यांनी केला. मात्र, सरकारने रात्री उशिरापर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केला नाही.मराठा संघटनांच्या वतीने खासदार संभाजीराजे, शिवसंग्रामचे विनायक मेटे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळांशी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी चर्चा केली. सध्या कोरोनाचा काळ आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी या नेत्यांनी केली. याशिवाय, अन्य काही मागण्यांवरही चर्चा झाली. सरकारने आम्हाला अनुकूल प्रतिसाद दिला, असा दावा मेटे, पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. आजच्या बैठकांना दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल परब हे मंत्रीही उपस्थित होते.समाजाच्या विविध मागण्यांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले. त्यामुळे १० आॅक्टोबरचा प्रस्तावित बंद स्थगित केल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली.
एमपीएससी परीक्षेबाबत अद्याप निर्णय नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 6:22 AM