मुंबईः जी आज आढावा बैठक घेतली. त्यात कोणत्याही विकासकामाला स्थगिती किंवा रद्द करण्यात आलेला नाही. त्याऐवजी ही कामं गतीनं कशी होतील, त्याच्याकडे आम्ही लक्ष देतोय. त्यातसुद्धा प्राधान्यक्रम ठरवून पुढची वाटचाल होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. आज भाजपाच्या काळातील समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्पांच्या स्थितीचा आम्ही आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे बोलत होते. विशेष म्हणजे या बैठकीला मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. प्रकल्पांची आवश्यकता, त्यांना लागणारा खर्च, निधीच्या उपलब्धतेसाठी कामांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. भाजपाच्या काळातील प्रकल्प पुढे कसे जातील, मेट्रोला फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प अधिक वेगानं कसे पूर्ण होतील, यासाठी प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये आर्थिक बोजा आहे, तो बोजा परतफेडीसाठी सरकारही भूमिका बजावणार आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत ही आमची भूमिका आहे. याच्यावर मुख्यमंत्री महोदय भाष्य करतील, असे जयंत पाटील म्हणाले.