मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करावा लागला. केंद्रीय पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय होण्याआधी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा झाली. मात्र या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आमची भूमिका वेगळी नाही. आमच्यामध्ये मतभेद नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची भूमिका मांडली. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. प्रसारमाध्यमंदेखील त्याला अपवाद नाहीत. त्याचे परिणाम वृत्तपत्रांवर झाले. राजकीय नेत्यांचे कार्यक्रम कमी झाल्यानं नाराजीच्या बातम्या आल्या. मात्र आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं शरद पवार म्हणाले. सुरुवातीच्या काळात कठोर लॉकडाऊन गरजेचा होता, अशी माझी भूमिका होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कठोर लॉकडाऊन केला. तशी भूमिका घेतली नसती, तर मुंबईची अवस्था न्यूयॉर्कसारखी झाली असती. मृतांची संख्या प्रचंड वाढली असती, असं शरद पवार यांनी सांगितलं.कोरोनाचा संकटाचा सामना करताना अर्थव्यवस्था सांभाळणं, ती रुळावर आणणंदेखील गरजेचं असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. 'अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याची आवश्यकता आहे. उद्योग प्रमुखांशी केलेल्या चर्चेतून ही बाब अधोरेखित झाली. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी दिल्ली, बंगळुरूत सूट देण्यात आली. त्याची काही प्रमाणात झळ बसली. पण व्यवहार सुरळीत झाले. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यास त्याचे परिणाम कोरोनापेक्षा जास्त गंभीर होतील,' असं शरद पवार म्हणाले.अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. एकाचवेळी सगळं खुलं करणं शक्य नाही. पण हळूहळू सुरुवात व्हायला हवी. मुख्यमंत्री त्याबद्दलचे निर्णय घेत आहेत. सावधगिरी बाळगून निर्णय घ्यायचं हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे. नुकसान होणार नाही, परिणाम काय होतील, याची खातरजमा करूनच ते निर्णय घेतात, अशा शब्दांत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीत फरक असल्याचं निरीक्षणदेखील त्यांनी नोंदवलं.
लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 9:07 AM