पुणे : आज २१ व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी की नाही याबाबत चर्चा करावी लागते, हे दुर्दैव आहे. अशी चर्चा करावी लागते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार रूजविण्यात मागे पडलोय. मात्र असा भेदभाव आम्ही राज्यकर्ते कधीच होऊ देणार नाही, अशी स्षष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेण्याची संधी महिलांनीही द्यावी, यासाठी राज्यात महिला संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आंदोलनही छेडले. मात्र पोलिसी खाक्याने हे आंदोलन दडपून टाकण्यात आले. त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत असताना मुख्यमंत्र्यांनी ही स्पष्टोक्ती दिली.याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या आधी कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांनीही काही मंदिरांमध्ये स्त्रियांना गाभाऱ्यापर्यंत प्रवेश दिला जात नाही, याबाबत खेद व्यक्त केला होता. मंदिरांमध्ये जाण्याचा अधिकार पुरूषांपेक्षा स्त्रियांना जास्त आहे असेही त्यांनी म्हटले होते. याच वक्तव्याला दुजोरा देत मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘समाजात स्त्री-पुरूष भेद राहायला नको. जगाचा इतिहास पाहिला तर प्रगत देशांनी मानव संसाधनात स्त्री व पुरूषांना समान संधी दिल्याचे दिसते. तेथे ५० टक्के स्त्रिया त्यांच्या प्रगतीच्या भागीदारी ठरल्या आहेत. ज्या देशात स्त्री-पुरूष समता प्रस्थापित होते ती राष्ट्रे खऱ्या अर्थाने विकसित होतात. त्यामुळे सध्याचे राज्यकर्ते असा कोणताही भेदभाव कधीच होऊ देणार नाहीत.’’ (प्रतिनिधी)
उपासनेत भेदभावाला नाही थारा
By admin | Published: January 30, 2016 1:51 AM