उस्मानाबाद : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता परत पक्षात घेणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खा. पवार सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण परत येऊ इच्छित आहे. त्याविषयी आम्ही चर्चा करून निर्णय घेतोय. परंतु, काहींच्या बाबतीत आम्ही पक्का निर्णय घेतलाय. आता त्यांना पुन्हा घेणे नाही. ‘गेलात तिथे सुखी रहा’, असे सांगतोय़ उस्मानाबादच्या बाबतीत हाच निर्णय घेतल्याचे सांगून पद्मसिंह यांच्या कुटूंबास आता राष्ट्रवादीत एन्ट्री नसल्याचे पवार यांनी त्यांचे नाव न घेता सांगितले. शिवाय डॉ. पाटील यांचे नाव निघताच त्यांनी कोपरापासून हात जोडले!
डॉ. पद्मसिंह पाटील हे पवारांचे जवळचे नातलग आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. राणा जगजितसिंह हे अजित पवारांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत परतणार असल्याची चर्चा होती. मात्र खा. पवारांच्या आजच्या विधानाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
एकनाथ खडसेंच्या पक्षांतरावर टाळले भाष्य -भाजप नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतलेत. विरोधी पक्षनेते म्हणून ते प्रभावी होते. विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. याची नोंद पक्ष घेत नाही, असे खडसेंना वाटत असेल. तसेच दुसरा पक्ष त्याची नोंद घेतो असेही त्यांना वाटले असेल, इतकेच बोलून खडसेंच्या पक्षांतरावरील वावड्यावर पवारांनी पूर्ण भाष्य करणे टाळले.
या नेत्यांनी सोडला पक्ष : विधानसभा निवडणुकीपूर्वी -जयदत्त क्षीरसागर, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, र्वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील, संदीप नाईक, सचिन अहिर आदी नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश केला आहे.