पिंपरी : राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील, सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनीच लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रवीण दरेकर यांनी सोमवारी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. दरेकर म्हणाले, डाॅ. तात्याराव लहाने यांनी भाजप सरकार मध्ये आपल्याला फार त्रास झाला अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतू, अशाप्रकारचे वक्तव्य त्यांच्यासारख्या व्यक्तीने करणे योग्य नाही. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनीच लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी पुढाकार घेतला होता.
शिवसेनेने ‘संभाजीनगर’बाबत कृती करावीशिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे. संभाजीनगर, असे नामकरणाची कृती करून दाखवावी, असे म्हणून प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली.
‘सामना’तून अण्णाहजारे यांच्या भूमिकेवर तिरकस भाष्य शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर ‘सामना’तून अण्णा यांच्या या भूमिकेवर तिरकस भाष्य करण्यात आले. याबाबत दरेकर म्हणाले, अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधता आला तर आला, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या दुर्दैवाने हा स्वार्थ साधता येत नाही. त्यामुळे ‘सामना’च्या अग्रलेखातून कुठल्यातरी निमित्ताने टीका केली जाते.