मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नजीकच्या काळात होण्याची शक्यता दिसत नाही. तसेच, महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्यांनाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे इच्छुकांच्या पदरी अद्याप तरी निराशाच आहे.विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या आधी विस्तार होणार असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केले होते. तथापि, नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे मग विस्तारच लांबणीवर पडला. अधिवेशनानंतर मुख्यमंत्रीही विस्ताराविषयी काहीही बोललेले नाहीत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मंत्रिमंडळाचा केवळ विस्तार नाही तर फेरबदलही केला जाईल, असे सांगत काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. तथापि, हा फेरबदल न झाल्याने मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले पक्षातील आमदार प्रतीक्षेतच आहेत.महामंडळे आणि समित्यांवरील पक्ष कार्यकर्ते, नेत्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगून आता दीड महिना लोटला तरी काहीही झालेले नाही. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे तर ‘महामंडळांवरील नियुक्ती लवकरच करणार’ असे दोन वर्षांपासून सांगत आले आहेत. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पक्षाच्या दादरमधील कार्यालयात होणार आहे. या बैठकीत पक्षविस्तारासाठी राबविलेल्या मोहिमेचा आढावा घेण्यात येईल. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यास पक्षाने जी यंत्रणा उभी केली आहे तिचाही आढावा घेण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
ना मंत्रिमंडळाचा विस्तार, ना महामंडळावर नियुक्ती!, भाजपात इच्छुकांच्या पदरी निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 4:50 AM