पालघर : गडचिंचलेच्या प्रकरणावरून काही लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे यापुढे हा धाक राहावा यासाठी कठोरातील कठोर पावले उचलली जातील, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमध्ये देत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.जिल्ह्यात प्रत्येक भागात पेट्रोलिंग आणि गस्त घालण्याचे आदेश आपण दिल्याचे सांगून या प्रकरणातील दोषी हे कुठल्याही पक्षाचे असोत, कितीही मोठी व्यक्ती असो, त्यांच्यावर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. १५ एप्रिलला डॉ. विश्वास वळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथे आलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक हत्याकांडाचे प्रकरण घडले, त्या कासा पोलीस ठाण्याला शिंदे यांनी भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांना सूचना दिल्या. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आ. श्रीनिवास वणगा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, सुरेंद्र नवले, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.पोलीस प्रशासनाने बोध घेतला नाही.एका सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने या घटनेतून कुठलाही बोध घेतला नसल्याचे मान्य करीत गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश मी दिले असून यापुढे अत्यावश्यक गरजेशिवाय कुणीही बाहेर पडल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
Palghar Mob Lynching: लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:54 AM