पिंपरी : चिखली, कुदळवाडी भागात भंगार मालाची गोदामे अनेक आहेत. सातत्याने या परिसरात छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडतात. या परिसरात लोकवस्तीही वाढली आहे. त्यामुळे या भागात अग्निशामक विभागाचे स्वतंत्र केंद्र होण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या मुख्य केंद्राकडून पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची दखल घेऊन केवळ इमरतीची पायाभरणी केली. त्यानंतर मात्र पुढील काम होऊ शकले नाही. या भागात अत्यंत गरज असूनही पाच वर्षांपासून चिखलीतील अग्निशामक केंद्राचा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही.अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिखलीतील पेठ क्रमांक १८मध्ये अग्निशामक विभागाचे केंद्र उभारण्याची मागणी केली. चिखलीसह एमआयडीसीतही असे केंद्र उभारण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. चिखलीतील प्रकल्पासाठी निदान कुदळ तरी लावली गेली. एमआयडीसीतील एच २ ब्लॉकमध्ये अग्निशामक केंद्राच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. आगीची दुर्घटना घडल्यानंतर थोडे दिवस चर्चा होते. चिखली व एमआयडीसीतील अग्निशामक केंद्राच्या प्रकल्प उभारणीबाबत प्रशासनातील अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता दिसून येत आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे असलेले मनुष्यबळसुद्धा अपुरे आहे. सद्य:स्थितीत १४५ कर्मचारीवर्ग या विभागाकडे उपलब्ध आहे. अग्निशामक विभागाच्या ताफ्यात केवळ १२ गाड्या आहेत. वाहनांची संख्या वाढवली, तर त्या तुलनेत वाहनचालकांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. ७ ते ८ लाख लोकसंख्या होती, त्या वेळी अग्निशामककडे जेवढे मनुष्यबळ होते, तेवढेच आताही आहे. (प्रतिनिधी)>चिखली परिसरात वारंवार आगीच्या घटना घडू लागल्याने तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी गतवर्षी याची गंभीर दखल घेऊन उपाययोजनांचे पाऊल उचलले. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुदळवाडी, चिखली परिसरातील भंगार मालाच्या व अन्य गोदामांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणानंतर अहवाल अग्निशामक विभागाकडे देणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही अग्निशामक विभागाला चिखली परिसराचा सर्वेक्षण अहवाल मिळालेला नाही. सर्वेक्षण झाले का नाही? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाच वर्षांपासून अग्निशामक विभागाचे अधिकारी चिखली आणि एमआयडीसीतील अग्निशामक केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करत आहेत.>उदासीनता : रखडला आरक्षणांचा विकासउदासीनतेमुळे आरक्षणांचा विकास रखडला आहे. आरक्षणे ताब्यात नाहीत, विकास कामे करता येत नाहीत. अशी सबब पुढे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आरक्षणे ताब्यात असताना, अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असतानाही विकास करता आलेला नाही. हे चिखलीतील अग्निशामक केंद्राच्या रखडलेल्या प्रकल्पामुळे निदर्शनास आले आहे. आरक्षणाची जागा ताब्यात आहे. काही अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे, तरी केवळ उदासीनतेमुळे या प्रकल्पांना मुहूर्त मिळालेला नाही. विकासकामे रखडल्याचे खापर अधिकाऱ्यांवर फोडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा नागरी विकासावर होत आहे.
अग्निशामक केंद्राला नाही मुहूर्त
By admin | Published: November 02, 2016 1:25 AM