मुंबई -अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का? या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.(No New Coronavirus Strain found in Amravati And Yavatmal)
आतापर्यंत अमरावती,यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन,दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत.
या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
अमरावती, अकोला जिल्ह्यांत संचारबंदी
गुरुवारी ५,४२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३८ मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती व अकोला जिल्ह्यात शनिवार, रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली जाणार आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश काढण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जमावबंदी असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. विदर्भातील रुग्णसंख्येत अचानक २० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे.
अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्णसंख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ३२ टक्के असून, अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ४८ टक्के आहे, तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर १५ टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा ८.८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.४८ टक्के एवढा आहे.
दुसरी लाट नव्हे; पण काळजी घ्या!
राज्यातील रुग्णवाढ ही कोरोनाची दुसरी लाट नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यासह मुंबईत झालेली रुग्णवाढ स्थानिक पातळीवरील आहे. सहवासितांचा शोध आणि निदान या दोन सूत्रांद्वारे हा संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली. चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पुढील दोन आठवड्यांपर्यंत रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसून येईल. कोणत्याही साथीच्या आजारात अशा प्रकारचे चढ-उतार येत असतात, असेही त्यांनी नमूद केले.