मुंबई : विधानसभेत राष्ट्रध्वज फडकविण्याची घटना गेल्या आठवड्यात घडली; ही पहिली आणि शेवटची घटना ठरावी, असे सांगत विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी यापुढे सभागृहात राष्ट्रध्वज कुणीही फडकवायचा नाही, असे निर्देश आज दिले. ‘भारत माता की जय’ वरून विधानसभेत झालेल्या गदारोळाच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी राष्ट्रध्वज फडकविले होते. त्यातील काही सदस्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप सत्तारुढ भाजपाने केला होता. अध्यक्षांनी आज सभागृहात सांगितले की, या संबंधीच्या क्लिप मी स्वत: बघितल्या. राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याची कोणत्याही सदस्याची भावना नव्हती, असे माझे मत झाले आहे. या सभागृहात आतापर्यंत बॅनर्स आणि फलक फडकावण्यात आले होते. पण ध्वज कधीच फडकविण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा सभागृहात राष्ट्रध्वज फडकवू नका, असे निर्देश अध्यक्षांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)
यापुढे सभागृहात राष्ट्रध्वज न फडकविण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 1:06 AM