अलिबाग (जि. रायगड) : महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पत्राद्वारे शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी जारी केलेल्या पत्रकात आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सर्व श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देश-विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काहींना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यापिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपद्ग्रस्तांसोबत कायम आहोत. =
यातील मृतांना सद्गती लाभो. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दुर्घटनेतील बळींची संख्या १३; दहा रुग्णांवर उपचारपनवेल (जि. रायगड) : खारघरमधील महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांची संख्या १३ झाली आहे. दुर्घटनेतील १० रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. श्री सदस्यांचे पार्थिव नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आले आहेत.मृतांमध्ये महेश नारायण गायकर (४२, वडाळा, मुंबई), जयश्री जगन्नाथ पाटील (५४, म्हसळा, रायगड), मंजूषा कृष्णा भोंबडे (५१, गिरगाव, मुंबई), स्वप्निल सदाशिव केणी (३०, शिरसाट बामन पाडा, विरार), तुळशीराम भाऊ वांगड (५८, जव्हार, पालघर), कलावती सिद्धराम वायचळ (४६, सोलापूर), भीमा कृष्णा साळवी (५८, कळवा, ठाणे), सविता संजय पवार (४२, मुंबई), पुष्पा मदन गायकर (६४, कळवा, ठाणे), वंदना जगन्नाथ पाटील (६२, करंजाडे, पनवेल), मीनाक्षी मिस्त्री (५८, वसई), गुलाब बबन पाटील (५६, विरार), विनायक हळदणकर (५५, कल्याण) यांचा समावेश आहे.