यंदा पावसाने दडीी मारली आहे. महिनाभर उशिराने आलेल्या पावसाने काही दिवसांतच यथेच्छ पडून घेत पुन्हा उसंत घेतली आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत उन पडले आहे. असे असताना पुढील अडीज महिने पावसाचे असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान पाऊस कोसळणार आहे. तर पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्ह्यात ११ व १२ ऑगस्ट ला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रावेर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती कडून शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी डख यांनी शेतकऱ्यांना हवामाना संदर्भात मार्गदर्शन केले. राज्यात पुढील काळातही मुसळधार पाऊस होणार असून सप्टेंबर व ऑक्टोबर मध्येही यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख म्हणाले आहेत.
कोयना धरणात पाण्याची आवक चार हजार क्यूसेकपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे धरणसाठाही ८३ टीएमसीच्या वर जाईना अशी स्थिती आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाने कोयना धरणातील विसर्ग बुधवारी सकाळपासून पूर्णत: बंद केला आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरलाच २२ मिलीमीटर झाला आहे. पश्चिम भागात ४० दिवस दमदार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह संपूर्ण कांदाटी खोऱ्याला पावसाने झोडपले.
जुलैमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत आतापर्यंत ८१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ही स्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही कायम राहणार असून पावसाचे दोन महिने अद्याप शिल्लक आहेत.