मुंबई : लहान मुलांना आईच हवी असते, आईकडे जाण्यासाठी मुलांची धडपड सुरू असते. तिने घ्यावे यासाठी ते धाय मोकलून रडत असतात. मात्र मंगळवारी उच्च न्यायालयात नेमके याविरुद्ध चित्र पाहायला मिळाले. सहा वर्षांचा चिमुरडा बाबांकडे जाण्यासाठी ‘आक्रोश’ करीत होता. आई नको, बाबा हवेत म्हणून ओरडत होता. परंतु, मुलाचे वय लक्षात घेत उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मुलाचा ताबा आईकडे देण्याचा आदेश दिला. माजी पतीला व सहा वर्षांच्या मुलाला न्यालायात हजर करण्यात यावे, यासाठी २८ वर्षीय महिलेने उच्च न्यायालयात हॅबिअस कॉर्पस दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर - जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.महिलेच्या म्हणण्यानुसार, २००६मध्ये तिचा विवाह झाला आणि २०१०मध्ये तिने मुलाला जन्म दिला. मात्र पतीबरोबर असलेल्या वादामुळे तिने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. डिसेंबर २०१४मध्ये कुटुंब न्यायालयाने तिचा घटस्फोट अर्ज मंजूर करत मुलाचा ताबा दिला. गेल्या वर्षी ८ आॅगस्ट रोजी मुलाच्या वडिलांनी मुलाला शाळेतून परस्पर सुरतला नेले. आपण घटस्फोट दिलेल्या पतीने परवानगीशिवाय मुलाला नेल्याने संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पतीने मुलाला सुरतला त्याच्या घरी नेऊनही पोलिसांनी तो हाती लागत नसल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात हॅबिअस कॉर्पस दाखल केली. मंगळवारच्या सुनावणीत वडिलांसह सहा वर्षांचा मुलगा न्यायालयात हजर होता. मुलाला अशा प्रकारे परस्पर नेल्याबद्दल उच्च न्यायालयाने मुलाच्या वडिलांना धारेवर धरले. उच्च न्यायालयाने आदेश देताच आईने मुलाला वडिलांकडून ओढून घेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलाने कोर्ट रूममध्येच जोरात रडण्यास सुरुवात केली. आईकडे नाही जायचं, बाबाच हवेत, असे ओरडायला लागला. मुलाच्या रडण्याने न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आल्याने उच्च न्यायालयाने त्याच्या आईला कोर्ट रूमच्या बाहेर गेल्यावर मुलाला घ्या, असे सांगितले. कोर्टरूमबाहेर गेल्यावरही मुलगा आईकडे जायला तयार नव्हता. अखेरीस आईने त्याला बाबांकडून खेचून घेतले आणि तो रडत असतानाच न्यायालयाबाहेर नेले. (प्रतिनिधी)
नाही... मला आई नको, बाबाच हवेत!
By admin | Published: January 11, 2017 5:04 AM